खचणारे शहर तेहरान

पृथ्वीच्या वातावरणात होत असलेल्या तापमान वाढीमुळे ध्रुवप्रदेशातील बर्फ वितळत आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभराच्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीवही वाढ होत आहे. त्या वाढीमुळे समुद्रकिनाया जवळची अनेक गावे आणि शहरेही पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल आपण नेहमीच चर्चा करीत असतो. नद्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारे नुकसान तत्काळीन असते. त्याच बरोबर पुरामुळे वाहून आलेली मातीही शेतीला सुपीक बनवीत असते. ह्या उलट समुद्राच्या पातळीमध्ये होणारी वाढ ही कायम स्वरुपाची असते. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले आहे की भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी त्या पेक्षा जास्त वेगाने जमिनीचा हास करीत आहे. भूगर्भामधील पाण्याचा साठा उपसून काढल्यामुळे फक्त भूजल पातळीच खोल जात नाही तर अशा साट्याच्या जागी पोकळी तयार होते. भूगर्भातील सच्छित्र खडक पाण्याचा साठा धरुन ठेवीत असतात. पण जेव्हा अशी पोकळी तयार होते. तेव्हा त्या खड्यांच्या छिद्रामध्ये साठलेले पाणी ही बाहेर पडते. ते पाणी बाहेर पडताना खडकांमधील खनिजेही घेऊन बाहेर पडते. त्यामुळे खडकातील रेणूंची एकमेकांना घट्ट धरुन टेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. खडक ठिसूळ बनतात. कोलमडून पडतात. आणि जमिनीला खालुन मिळणारा आधार नाहिसा होतो. ती जमिन हळूहळू खचायला लागते.


 इराणची राजधानी तेहरान आज याच धोक्यावर उभे आहे. तेहरानचे क्षेत्रफळ पावणेदोन हजार चौरस कि.मी. एवढे आहे. ते शहर समुद्रापासून ६५ कि.मी. एवढ्या दूर आहे. तसेच ते समुद्र सपाटीपासून १००० ते १४५० मीटर एवढ्या उंचावर आहे. त्यामुळे त्याला समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये होणाऱ्या परिणामाचा धोका नाही. पण सन २००३ ते २०१७ या पंधरा वर्षाच्या कालावधीमधे उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांच्या सहाय्याने असा निष्कर्ष काढला आहे की, तेहरान हे शहर दरवर्षी २५ से. मी. एवढ्या वेगाने खचत आहे. तेहरान शहराची लोकसंख्या दीड कोटीपेक्षा जास्त आहे. पश्चिम अशियातील सर्वात मोटे शहर म्हणून तेहरानची ओळख आहे. सन १९५० नंतर तेहरानच्या उपनगरात अनेक उद्योगधंदे उभे राहिले. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या पाण्याची मागणी वाढायला लागली. ती गरज भागविण्यासाठी त्यांनी बोअरवेल सारख्या उपायांनी भूगर्भातील पाण्याचा साठा उपसायला सुरुवात केली. तेहरानमध्ये जेमतेम २५ से.मी. पाऊस पडतो. ते पाणीसुध्दा वाहून गेल्याने जमिनीत जिरत नव्हते. पण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इतरत्र उपाय केले जातात तोच उपाय त्यांनीसुध्दा केला. सन १९६३ साली तेहरानच्या २५ कि.मी. अंतरावर जासरु नदीवर धरण बांधले. त्या धरणाची क्षमताही ९५ लाख घनमीटरएवढी होती. पण अपुया पावसामुळे ते धरण अर्धेही भरु शकले नाही. एवढेच नाही तर पाणी एकाच ठिकाणी साठवले गेल्यामुळे सर्वत्र जमिनीमध्ये झिरपणारे पाणी ते ही पसरु शकले नाही. परिणामी इतरत्र भूजळ साट्याची खोली वाढली. त्यामुळे उद्योगांनी आणि शेतकऱ्यांनी आपापल्या उपयोगासाठी आणखी कुपनलिका खोदल्या.


या सार्वाचा परिणाम म्हणून तेहरान महानगराची जमिन वर्षाकाठी २५ से. मी. एवढी खचते. अनेक घरे कलंडू लागली आहेत. भिंतीना तडे गेले आहेत. घरातील जमिनी खचून फरशा उखडल्या जात आहेत. अधुन-मधून रस्ते, मैदाने येथेही अचानक खड्डे पडतात. तेहरानचा आंतरराष्ट्रीय विमानतळही वर्षाकाठी ५ से. मी. खचत आहे. त्यामुळे काही दिवसांनी येथील उड्डाणेही धोकादायक ठरु शकतात. आज भारतात अनेक ठिकाणी भूजलाचा उपसा प्रचंड प्रमाणात होत आहे. तेहरानच्या उदाहरणाने आपण काही शिकणार आहोत का नाही?